Monday 2 October 2017

जो देना है वही देना है, जो देना नही वह देना नही

17 सप्टेंबर, रविवारी अनेक दिवसांनी एखाद्या यशस्वी माणसाचे मार्गदर्शन मिळाले आणि मनात चालू असलेल्या असंख्य प्रश्नांना थोडे का होईना उत्तर मिळाले. हे व्याख्यान होते ‘पत्रकारितेचे बदलते स्वरूप आणि या स्थितीत पत्रकाराची भूमिका’ या विषयावरचे, तर मार्गदर्शक होते देवगिरी तरुण भारतचे माजी संपादक दिलीप धारूरकर.

मूळ पिंड अभियंत्याचा असलेले दिलीप धारूरकर यांनी 1998 साली पुणे विद्यापीठात राज्यशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी 1998 साली औरंगाबाद येथील दैनिक तरुण भारतात पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे ते तरुण भारतच्या संपादकपदापर्यंत पोहोचले. त्यांचा अनुभव हा आमच्यासारख्या पत्रकारितेत आलेल्या नवख्या पत्रकारांना ऐकायला मिळाला, हेच आमचे भाग्य होते. पत्रकारितेचे स्वरूप कसे बदलत गेले, हे धारूरकरांनी आमच्यासमोर मांडले. 

आपल्या भाषणात अनेक दाखले देतांना त्यांनी लोकमान्यांच्या पत्रकारितेचे ते दिवस कसे होते?, स्वराज्याची संकल्पना सर्वसामान्यांमध्ये टिळकांनी कशी रुजवली?, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अवलोकन वाचकांच्या समक्ष त्यावेळी कसे मांडल्या जात होते? याचे संपूर्ण चित्रच त्यांनी आमच्यासमोर उभे केले.  त्यानंतर वर्तमानपत्रांच्या बदलत्या परिस्थितीबद्दल मुद्दा मांडताना राज्यातील अनेक वर्तमानपत्रे कशी स्वत:चे ध्येय सोडून इतर वर्तमानपत्रांशी व्यवसायविषयक स्पर्धा करून पुढे गेले, याबाबत सांगितले.  

आता तर नेमकी बातमी कोणती, याचेही मापदंड बदलले आहेत.  अनेक वर्तमानपत्रे ही केवळ मालकांच्या नावाने चालतात, तर अनेक वर्तमानपत्रांत, या बातम्या सत्य असल्या तरी आपल्याला छापता येणार नाही, असे सर्रासपणे सांगितले जाते. इतकेच नव्हे तर वाचक जसा जसा संगणकाचा मित्र होतो आहे, तसेतसे पत्रकारितेचे माध्यमही बदलत चालले आहे. मात्र या सगळ्यात आमच्या सारख्या नवख्या पत्रकारांच्या मनात एक प्रश्न कायमच असतो आणि तो म्हणजे ‘आपण पत्रकारितेत ज्या उद्देशाने आलो, तो उद्देश साध्य करता येईल का?’  तो जर करायचा असेल तर ज्या उद्देशाने वृत्तपत्र सुरू झाले आहे, तो उद्देश सातत्याने आपल्या बातमीतून, आपल्या लेखांमधून उमटला पाहिजे, हे त्यांनी निक्षून सांगितले. त्यासाठी त्यांनी लोकमान्यांच्या मराठाचे उदाहरण दिले.   

4 जानेवारी 1881 साली लोकमान्यांच्या दैनिक मराठाची पहिली प्रत प्रसिद्ध झाली. त्याकाळी इंग्रजांचे राज्य होते, मात्र स्वराज्याचा आणि देशभक्तीचा प्रसार सर्वसामांन्यापर्यंत पोहोचावा या उद्देेशानेच हे दैनिक छापले जात होते. तो उद्देश सातत्याने लोकमान्यांच्या लिखाणातून झळकत असल्याने जनतेच्या मनात त्याकाळी या दैनिकाबद्दलचे कुतूहलही अधिक होते. लोकमान्यांनी तेव्हा लिहून ठेवलेले आजही तंतोतंत लागू पडते आहे, याकडे लक्ष वेधत धारूरकर यांनी आज पत्रकारितेची कास धरणार्‍यांना लोकमान्य टिळक, आचार्य अत्रेंचे लेख वाचून त्यांच्याप्रमाणे आपला उद्देश वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वत:मध्ये बदल करणे आवश्यक असल्याचे सांगितले. आज निर्माण झालेल्या परिस्थितीत या नव पत्रकाराला आपला उद्देश सफल करायचाच असेल तर, त्याचे स्मरण आणि चिंतन सातत्याने करायलाच हवे. सत्य पोहोचविणे हे त्याचे कर्तव्य असेलच मात्र यासोबत त्याच्या लिखाणातून वाचकांच्या भावना तर दुखावल्या जाणार नाही ना? ही देखील काळजी त्याने घेतली पाहिजे. ही काळजी घेताना ‘जो देना है वही देना है, जो देना नही वह देना नही’ हे सूत्रही कायम लक्षात ठेवले तरच त्याचा उद्देश सफल होईल.